नसरापूर येथील अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला. मात्र या निकालामागे केवळ न्यायालयीन प्रक्रिया नव्हती, तर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेला शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि अथक तपासही तितकाच महत्त्वाचा ठरला. या संपूर्ण तपासाचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी विजयमाला पवार आणि त्यांच्या संपूर्ण तपास पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत तब्बल १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करणे ही मोठी आणि आव्हानात्मक कामगिरी होती. या आरोपपत्रामध्ये सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, शवविच्छेदन अहवाल, न्यायवैद्यक पुरावे, सायबर तपास, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच इतर सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे अत्यंत सक्षमपणे सादर करण्यात आले. त्यामुळे आरोपीला कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी सात विशेष तपास पथके रात्रंदिवस कार्यरत होती. प्रत्येक पथकाने आपापली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. डॉक्टर, न्यायवैद्यक तज्ज्ञ, फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील अधिकारी, सायबर एक्सपर्ट, सरकारी वकील तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम करत तपासाला भक्कम दिशा दिली. या संपूर्ण तपासाची सूत्रे हाताळणाऱ्या तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी दाखवलेली चिकाटी, बारकाई आणि व्यावसायिकता विशेष उल्लेखनीय ठरली. प्रत्येक पुरावा न्यायालयात टिकेल, प्रत्येक दुवा निर्विवाद असेल आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळेल, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत अखेर यशस्वी ठरली. न्यायालयाने आपल्या निकालात पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासाचे विशेष कौतुक केले. उपलब्ध पुरावे, तपासाची गुणवत्ता आणि सादरीकरण यामुळे आरोपीविरुद्धचे दोषारोप निर्विवाद सिद्ध झाले. हा निकाल केवळ एका आरोपीला झालेली शिक्षा नसून, समाजातील महिलांवर आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कायदा कोणतीही दया दाखवणार नाही, असा ठाम संदेश देणारा आहे. या यशामागे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांचे मार्गदर्शन, संपूर्ण तपास पथकाची निष्ठा आणि विशेषतः तपास अधिकारी विजयमाला पवार यांचे प्रभावी नेतृत्व निर्णायक ठरले.
एका निष्पाप चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्था आणि पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव होणे ही समाजाचीही जबाबदारी आहे.
