पुणे, दि. ७ मे (जिमाका वृत्तसेवा) : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील प्रदूषणात आरएमसी प्लॅन्ट्सचा काही प्रमाणात वाटा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आरएमसी उद्योगासाठी येत्या तीन आठवड्यांत मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील चार ते सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रासाठी प्रदूषणमुक्त ‘कोर झोन’ निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.
या बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी , दोन्ही महानगर वरिष्ठ पोलिस अधिकारी,वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच पुणे जिल्हा रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
