पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी ४ टक्के सवलतीची योजना जाहीर केली असून, दुसरीकडे थकबाकीदारांविरोधात जप्तीची मोहीमही वेगाने सुरू केली आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने एसएमएस, टेली कॉलिंग आणि डिजिटल माध्यमातून करदात्यांशी थेट संपर्क साधण्याची मोहीम सुरू केली आहे. कर भरण्याची अंतिम मुदत, उपलब्ध सवलती, थकबाकीची माहिती तसेच ऑनलाइन कर भरण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. डेटा आधारित संवाद प्रणालीमुळे प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत माहिती प्रभावीपणे पोहोचत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ३ लाख ४७ हजार ५६४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरला असून, ही आतापर्यंतची विक्रमी नोंद ठरली आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. १८ विभागीय कार्यालयांमार्फत ३५ हजारांहून अधिक थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळूनही कर न भरणाऱ्या बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तर निवासी मालमत्ताधारकांची थकबाकी कायम राहिल्यास त्यांचे पाणीपुरवठा जोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांचे आभार मानत, उर्वरित मालमत्ताधारकांनीही ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. उपायुक्त सचिन पवार यांनीही प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी थकीत कर तातडीने भरण्याचे आवाहन केले आहे.
