मॅगझीन चौक ते भक्ती शक्ती चौकापर्यंत प्रत्यक्ष पाहणी
स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थेचा घेतला आढावा
पिंपरी-चिंचवड : आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने तयारीला वेग दिला असून महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले. वारकरी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी टेहळणी टॉवर उभारावेत. स्वच्छता आरोग्य सेवा पिण्याचे पाणी वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहता कामा नये असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
महापौर रवि लांडगे यांनी सकाळी मॅगझीन चौकातून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर भक्ती शक्ती चौकासह पालखी मार्गावरील विविध ठिकाणांची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. लाखो वारकरी शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे असे त्यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान रस्त्यांची स्थिती खड्डेमुक्ती स्वच्छता पिण्याच्या पाण्याची उपलब्धता चलत शौचालयांची व्यवस्था आरोग्य पथके रुग्णवाहिका अग्निशमन यंत्रणा वाहतूक नियोजन प्रकाश व्यवस्था आणि दिशादर्शक फलक यांची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या तातडीने दूर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
पालखी मार्गावरील प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही विभागाच्या निष्काळजीपणामुळे वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवाव्यात असे निर्देशही त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम सहशहर अभियंता बापू गायकवाड उपआयुक्त अण्णा बोदडे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे निवेदिता घार्गे कार्यकारी अभियंते शिवाजी चौरे दमयंती पवार चंद्रकांत मुथाळ जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा विद्युत वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा वैभवशाली सोहळा आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण मिळावे ही महापालिकेची जबाबदारी आहे. प्रशासनाने कोणतीही हयगय न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच नागरिकांनीही स्वच्छता राखून आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.
