मुंबईत रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्रथम नागरिकांची भेट

मुंबई : मुंबई महानगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जोर धरला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मुंबईच्या प्रथम नागरिक तथा महापौर ऋतु तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी शहरातील विविध विभागांतील पावसाची सद्यस्थिती, सखल भागांमधील पाणी उपसा यंत्रणांचे कामकाज, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतूक व्यवस्था तसेच आपत्कालीन यंत्रणांची तयारी याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

या आढावा बैठकीला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) शरद उघडे, संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर ऋतु तावडे यांनी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, शहरातील कोणत्याही भागात पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करण्यात यावे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी मुंबईकरांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी म्हटले.

मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *