शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला. भरमौरहून चंबाकडे येणाऱ्या हिमाचल पथ परिवहन महामंडळाच्या (HRTC) बसवर अचानक डोंगरावरून प्रचंड मोठा दगड कोसळल्याने बसचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गहेरा परिसरात रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बस (क्रमांक HP-30A-0352) चंबाच्या दिशेने जात असताना डोंगरावरील मोठा दगड थेट बसच्या छतावर कोसळला. दगडाने बसचे छप्पर फोडत आत प्रवेश केल्याने बसमधील प्रवासी घाबरून गेले आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिक तपशील प्रशासनाकडून गोळा केला जात आहे.
हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळणे आणि दगड घसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिक आणि प्रवाशांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ मार्गांवरील प्रवास टाळण्याचे तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
