नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; गोव्यातील 2013 च्या टोलनाका तोडफोड प्रकरणी मापसा न्यायालयाकडून अटक वॉरंट

मापसा (गोवा) : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोव्यातील धारगळ-पेडणे टोलनाका तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात मापसा न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. 2013 मध्ये घडलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (4 जुलै) झालेल्या सुनावणीला या प्रकरणातील इतर सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. मात्र, नितेश राणे न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची न्यायालयाने गंभीर दखल घेत अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले.

हे प्रकरण 2013 मध्ये गोव्यातील धारगळ-पेडणे टोलनाक्यावर झालेल्या कथित तोडफोड आणि टोलनाका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. या घटनेनंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे नितेश राणे यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर नितेश राणे किंवा त्यांच्या वकिलांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेला होणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *