‘सत्तेचा माज वरून खालपर्यंत’; डोंबिवली-महाड प्रकरणावरून मनसेचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यातील दोन वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. डोंबिवली येथे शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण झाल्याचा आरोप, तसेच महाड येथे भाजपच्या नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर टीका केली.

गजानन काळे यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये, “सत्तेचा माज बघा वरून खालपर्यंत कसा आला आहे… डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण, तर महाडमध्ये भाजपच्या नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्याला मारहाण… तरी बोलायचे नाही, कारण महाराष्ट्राचा अपमान होतो,” असे म्हणत सरकारवर उपरोधिक टीका केली.

राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. अशा घटनांमध्ये कायद्याचे राज्य अबाधित राहावे आणि दोषींवर निष्पक्ष कारवाई व्हावी, अशी मागणीही विविध स्तरांतून होत आहे. गजानन काळे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *