मुंबई(,mumbai) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पातील त्रुटी, दरड कोसळण्याच्या घटना आणि जनतेच्या सुरक्षेचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी विचारले जाणारे योग्य प्रश्न आहेत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. “मिसिंग लिंकवर बोललं की राजकारण? अरे वा! मग तुम्ही काय करत होता? अंगाशी आल्यावर राजकारण? त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठं आला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रकल्पाच्या दर्जाबाबत, कामकाजातील त्रुटींबाबत आणि सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत प्रश्न विचारणाऱ्यांवर आरोप करण्याऐवजी सरकारने प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंक प्रकल्पावरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांवर कठोर शब्दांत निशाणा साधत “भाडे के टट्टू” असा उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांसह विविध राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर आक्षेप घेत टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेमुळे मिसिंग लिंक प्रकरणावरील राजकीय वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, कामांचा दर्जा आणि जनतेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे.
