गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार उघड; धावत्या कारमध्ये पोर्टेबल मशीनद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी, चौघे ताब्यात

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात धावत्या कारमध्ये पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत हा रॅकेट उघडकीस आणला.

माहितीनुसार, ४ जुलैच्या मध्यरात्री आरोग्य विभागाच्या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत UP14 FL 9355 क्रमांकाची कार अडवली. तपासादरम्यान कारमध्ये पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशीनच्या सहाय्याने गर्भाचे लिंग सांगितले जात असल्याचे समोर आले.

या कारवाईत संदीप, सलमान, शाहिद आणि तस्लीम या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी संदीप याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाही तो बेकायदेशीर गर्भलिंग चाचणीचा व्यवसाय सुरू ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस आणि आरोग्य विभागाने पुढील तपास सुरू केला असून, या अवैध रॅकेटशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. गर्भलिंग चाचणीवर कायद्याने बंदी असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *