प्रतिनिधी | नवी दिल्ली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भातील वक्तव्याला पाठिंबा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत आपल्याला कोणतेही आश्चर्य वाटत नसल्याचे सांगत त्यांनी सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची भाजपची भूमिका असल्याचा आरोप केला.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये निवडून आलेल्या सरकारांना अस्थिर करण्याचे आणि आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न झाल्याचे देशाने पाहिले आहे. ही केवळ राजकीय स्पर्धा नसून लोकशाही आणि मतदारांच्या जनादेशावर थेट आघात आहे.
यापुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, सत्ता मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करून सरकारे पाडणे आणि स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो, जे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, भाजपने यापूर्वीही अशा सर्व आरोपांचे सातत्याने खंडन केले असून, विरोधकांकडून राजकीय हेतूने अशा आरोपांचा आधार घेतला जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
