पिंपरी-चिंचवड:आपल्या लाडक्या वाहनासाठी आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक (VIP Number) शोधणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पिंपरी-चिंचवड (मोशी) येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH 14 NN’ ही नवीन मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी आरटीओ प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
चारचाकी वाहनांना मिळणार प्रथम प्राधान्य
नव्याने सुरू होणाऱ्या या दुचाकी मालिकेतील व्हीआयपी क्रमांक चारचाकी वाहनधारकांनाही घेता येणार असून, त्यांना यामध्ये प्रथम प्राधान्य दिले जाईल. मात्र, यासाठी चारचाकी वाहनधारकांना तिप्पट शुल्क भरावे लागेल.
असे आहे अर्जांचे वेळापत्रक:
चारचाकी वाहनांसाठी (तिप्पट शुल्क): दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
दुचाकी वाहनांसाठी (उर्वरित क्रमांक): दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
लिलाव पद्धतीचा अवलंब होणार
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास, पारदर्शक लिलाव पद्धतीने क्रमांकांचे वाटप केले जाईल.
चारचाकीची लिलाव प्रक्रिया: १६ जुलै रोजी सकाळी नोटीस बोर्डवर यादी जाहीर होईल. जास्त रकमेचा डीडी द्यायचा असल्यास त्याच दिवशी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात देणे आवश्यक आहे. दुपारी ३.३० वाजता अर्जदारांच्या उपस्थितीत पाकिटे उघडून सर्वाधिक रकमेचा डीडी देणाऱ्याला क्रमांक दिला जाईल.
दुचाकीची लिलाव प्रक्रिया: १७ जुलै रोजी सकाळी यादी जाहीर होईल. दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकीट स्वीकारले जाईल आणि दुपारी ३.३० वाजता अंतिम वाटप केले जाईल.
महत्त्वाची अट: एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलून किंवा रद्द करून मिळणार नाही. क्रमांक आरक्षित केल्यापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेले शुल्क सरकारजमा होईल.
अर्जासोबत ‘या’ गोष्टी आवश्यक:
इच्छुक नागरिकांनी मोशी येथील आरटीओ कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात अर्ज सादर करावा. अर्जासोबत ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे असलेला नॅशनल/शेड्युल्ड बँकेचा (पुणे येथील) डीडी, आधारकार्ड (मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेले), पॅनकार्ड, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना सुलभतेने क्रमांक मिळावा म्हणून या वेळापत्रकाचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.
