देहू : उसने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर रक्तरंजित ठरला. कर्जदारांच्या सततच्या तगाद्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यातून झालेल्या तीव्र वादात लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. छातीत गंभीर वार झाल्याने मोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे माळवाडी, देहूगाव येथे घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून देहूरोड पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
विनायक राजेंद्र कुदळे (वय २४) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी त्याचा लहान भाऊ घनश्याम राजेंद्र कुदळे (वय २०, सध्या रा. माळवाडी, हनुमान मंदिराजवळ, देहूगाव, मूळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कुंदन हिरालाल भात (वय २३) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक कुदळे याने काही व्यक्तींकडून हातउसने पैसे घेतले होते. मात्र, ते वेळेत परत न केल्याने संबंधित व्यक्ती वारंवार घरी येऊन पैशांची मागणी करत होत्या. याच कारणावरून मंगळवारी पहाटे दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात घनश्याम याने घरातील चाकू उचलला आणि विनायकच्या छातीच्या डाव्या बाजूला वार केला.
गंभीर जखमी झालेला विनायक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी घनश्याम कुदळे याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेला रक्ताने माखलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.
एका आर्थिक वादाने दोन सख्ख्या भावांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एका भावाचा जीव गेला, तर दुसऱ्या भावाच्या हातात बेड्या पडल्या. या दुर्दैवी घटनेमुळे देहूगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून देहूरोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
