पिंपरी-चिंचवड:
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यात कसूर, गंभीर निष्काळजीपणा आणि ९ निष्पाप कंत्राटी कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुख्य अभियंता-१ (गट-अ) श्री. कुलकर्णी संजय नारायण यांना तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे. यासोबतच त्यांची विभागीय चौकशी (Departmental Enquiry) सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
गत ८ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा एक मोठा भाग खचून लगतच्या आर.सी.सी. इमारतीवर कोसळला होता. या अत्यंत दुर्दैवी व भीषण दुर्घटनेत ९ कंत्राटी कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. या विभागाचे प्रमुख म्हणून कचरा डेपोच्या दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण करणे, सुरक्षिततेची काटेकोर अंमलबजावणी करणे ही सर्वस्वी जबाबदारी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांची होती.
खुलासा ठरला असमाधानकारक आणि तथ्यहीन
या प्रकरणी प्रशासनाने कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १४ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्यांनी मुदतीनंतर (संध्याकाळी ६.०५ वाजता) आपला खुलासा सादर केला. आयुक्त स्तरावर या खुलाशाची कसून तपासणी केली असता, तो अत्यंत असमाधानकारक, तथ्यहीन आणि नियमांचे समर्थन न करणारा आढळला.
कुलकर्णी यांनी शासकीय कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा केला, अधिकारांचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामास प्रशासकीय अभय दिले आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले, असे सकृतदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्यांचे हे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदींचा भंग करणारे असून महापालिकेची प्रतिमा मलिन करणारे ठरले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मोठी कारवाई: मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी तडकाफडकी निलंबित!
