पिंपरी-चिंचवड :
पहाटेच्या शांत वातावरणात टाळ-चिपळ्यांचा नाद करत, “वासुदेव आला हो…” अशी साद घालणारा वासुदेव आता पिंपरी-चिंचवड शहरातून जवळपास अदृश्य झाला आहे. बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक पारंपरिक लोककला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.
एकेकाळी शहर आणि गावांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले हे लोककलावंत आज उपजीविकेसाठी संघर्ष करताना दिसत आहेत.
पूर्वी पहाटेच्या वेळी वासुदेव, बहुरूपी, गोंधळी, गारुडी, डोंबारी आणि पिंगळा यांसारखे लोककलावंत घराघरांत जाऊन कला सादर करत असत. त्यांच्या आगमनाने परिसरात वेगळेच चैतन्य निर्माण होत असे. नागरिकही आनंदाने धान्य, कपडे किंवा आर्थिक मदत देत. त्यावरच या कलाकारांचा संसार चालत असे.
मात्र, काळ बदलला. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मनोरंजनाची साधने घराघरांत पोहोचली. त्यामुळे प्रत्यक्ष लोककलेकडे नागरिकांचा ओढा कमी झाला. परिणामी अनेक पारंपरिक कलाकारांनी हा व्यवसाय सोडला. काहींनी मजुरीचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी इतर व्यवसायांकडे वळणे पसंत केले.
वासुदेवाबरोबरच बहुरूपी, डोंबाऱ्याचे खेळ, गारुडी, गोंधळी, आराधी, पिंगळा तसेच भविष्य सांगणारे ज्योतिषीही आता क्वचितच पाहायला मिळतात. नवीन पिढीला या लोककलांची ओळखही उरलेली नाही. त्यामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन हा गंभीर प्रश्न बनला आहे.
लोककलावंतांचे म्हणणे आहे की, पारंपरिक कलेला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. शासनाच्या योजनांचा लाभही सर्वांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांवर उपजीविकेचे संकट ओढवले आहे.
सांस्कृतिक जाणकारांच्या मते, लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. या परंपरा जपण्यासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे. नागरिकांनीही या कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास हरवत चाललेली सांस्कृतिक परंपरा पुन्हा नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकते. आजही अनेक नागरिकांना पहाटेचा वासुदेव आठवतो. मात्र, त्याचा आवाज आता केवळ आठवणींमध्येच उरल्याची खंत शहरवासीय व्यक्त करत आहेत.
