Pune-‘तुमच्या गावातील पर्यटनाचा खजिना जगासमोर आणा’: पुणे जिल्ह्यातील लपलेली पर्यटनस्थळे शोधण्यासाठी पर्यटन विभागाचे आवाहन

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य आणि ग्रामीण पर्यटनस्थळांची माहिती व छायाचित्रे मागवली; नागरिकांच्या सहभागातून तयार होणार पर्यटनाचा नवा नकाशा

पुणे :
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांबरोबरच दुर्लक्षित आणि लपलेल्या पर्यटनस्थळांना राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसमोर आणण्यासाठी पर्यटन संचालनालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्गरम्य, ग्रामीण आणि साहसी पर्यटनस्थळांची माहिती, छायाचित्रे व आवश्यक तपशील नागरिक, पर्यटनप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच विविध संस्थांकडून मागविण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात अनेक अशी ठिकाणे आहेत, ज्यांचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य समृद्ध असले तरी त्यांची पुरेशी माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेली नाही. अशा ज्ञात आणि अज्ञात पर्यटनस्थळांचा शोध घेऊन त्यांचा पर्यटन विकासाला चालना देण्याचा पर्यटन संचालनालयाचा उद्देश आहे.

पर्यटन विभागाने नागरिकांना संबंधित पर्यटनस्थळाचा इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, वैशिष्ट्ये, आकर्षक छायाचित्रे, नकाशे, उपलब्ध कागदपत्रे, तेथे पोहोचण्याचे मार्ग, वाहतुकीची सुविधा, स्थानिक संस्कृती तसेच भेट देण्यासाठी योग्य हंगाम याची माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे.

संकलित माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची व्यापक नोंद तयार करण्यात येणार असून, त्याचा उपयोग पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नवीन पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

पर्यटनस्थळांची माहिती, छायाचित्रे, नकाशे आणि अन्य कागदपत्रे ddtourism.pune-mh@gov.in या ई-मेलवर किंवा ९५११८७४००८ आणि ८२७५३८७०३२ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर पाठवता येणार आहेत.

पर्यटन संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सहभागातून पुणे जिल्ह्याचा पर्यटनाचा नवा चेहरा जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न असून, प्रत्येक गावातील पर्यटन वारसा प्रकाशझोतात आणण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *