पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १.१३ लाख विद्यार्थ्यांमध्ये रुजवली रस्ते सुरक्षेची संस्कृती ३१ व्या टप्प्यात १४ शाळांतील १,८३५ विद्यार्थ्यांचे प्रबोधन; सायबर गुन्हे, सोशल मीडियाबाबतही मार्गदर्शन

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भावी पिढीला केवळ वाहतुकीचे नियम नव्हे, तर जबाबदार नागरिकत्वाचे धडे देण्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरला आहे. उपक्रमाच्या ३१ व्या टप्प्यात शहरातील १४ शाळांमध्ये वाहतूक पोलिसांच्या १४ पथकांनी भेट देत १ हजार ८३५ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे, या उपक्रमातून आतापर्यंत ५०२ शाळांमधील तब्बल १ लाख १३ हजार १७१ विद्यार्थ्यांपर्यंत रस्ते सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश पोहोचविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी हा उपक्रम राबविला जातो. यावेळी १२ अधिकारी आणि १८ पोलीस अंमलदारांच्या १४ पथकांनी विविध शाळांमध्ये जाऊन पीपीटी सादरीकरण, प्रत्यक्ष उदाहरणे आणि संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट आणि सीटबेल्टचे महत्त्व, अपघातांची कारणे तसेच सुरक्षित प्रवासाची माहिती दिली.
बदलत्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः नियमांचे पालन करण्याबरोबरच पालकांनाही वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूक करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
हा उपक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या उपक्रमाचा ३२ वा टप्पा ६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *