Delhi-नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाचे भव्य प्रदर्शन; ‘व्होकल फॉर लोकल’ला बळ देण्याचे आवाहन
नवी दिल्ली : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘भारत टेक्स २०२६’च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून २० जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील हातमाग, वस्त्रोद्योग आणि पारंपरिक कारागिरीची विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
यावेळी निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील विणकर आणि कारागिरांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करून ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे त्यांनी सांगितले.
हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्रोद्योगाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार असून, स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन मिळण्यासही मदत होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.