Mumbai-सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अभिनेते शेखर सुमन यांचा पाठिंबा; “व्यवस्था गप्प, पण देशाच्या युवकांसाठी ते एकटे लढत आहेत”
मुंबई : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आता बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शेखर सुमन यांनी सोशल मीडियावर सरकार आणि व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली.
शेखर सुमन म्हणाले की, सोनम वांगचुक अनेक दिवसांपासून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात उपोषण करत आहेत. मात्र, या गंभीर आंदोलनाकडे सरकारसह समाजातील अनेक घटक दुर्लक्ष करत असल्याचे अत्यंत दुर्दैवी आहे.
“एक व्यक्ती देश आणि समाजाच्या भल्यासाठी, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता उपोषणावर बसला आहे. शिक्षण व्यवस्थेतील बिघाड सुधारण्यासाठी तो संघर्ष करत आहे, पण व्यवस्था मात्र शांतपणे पडून आहे. ही व्यवस्था केवळ मुकी आणि बहिरीच नाही, तर असंवेदनशील, कठोर आणि हृदयहीन झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “त्यांचे शरीर थकले असेल, पण त्यांच्या मागे देशातील लाखो युवकांची ताकद उभी आहे. नीट पाहिलं तर आपण सगळे जिवंत असूनही निष्क्रिय आहोत, आणि खऱ्या अर्थाने जिवंत राहून लढणारा माणूस म्हणजे सोनम वांगचुक आहेत. मला आश्चर्य वाटतंय की, या परिस्थितीकडे पाहून कुणालाच आश्चर्य का वाटत नाही?”
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींकडून पाठिंबा वाढत असून, त्यांच्या प्रकृतीबाबतही देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.