मुंबई:
महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट वीज वितरण कार्यालयासमोरच बिछाने अंथरून ‘झोपा आंदोलन’ सुरू केले.
आंदोलनादरम्यान महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावरच झोपून वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वेगळेच चित्र पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात केला.
या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये अनेक आंदोलक रस्त्यावर बिछाने अंथरून झोपलेले दिसत आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे शेती, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
वीज पुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही, तर यापुढे आणखी तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
