Mumbai-तीन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांना गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
मुंबई :
राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संत जनाबाई तीर्थक्षेत्र (गंगाखेड, जि. परभणी), संत श्री गाडगेबाबा समाधी स्थळ (अमरावती) आणि श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर (काटोल, जि. नागपूर) या तीन महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांसाठी आधुनिक सुविधा, मूलभूत पायाभूत विकास, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पर्यटनाला चालना तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन या बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंग ठाकूर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा नियोजनबद्ध विकास करून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.