दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उग्र वळण; संसद भवनाकडे कूच, आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, अभिजीत दिपके ताब्यात असल्याचा दावा
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सोमवारी उग्र वळण लागले आहे. संसद भवनाकडे कूच करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला आहे. आंदोलनामुळे संसद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने पक्षाचे प्रमुख नेते अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, याबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था आधीच कडक करण्यात आली असून, आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणावर प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.