पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी २१ व २२ जुलैला पावसाचा जोर वाढणार; पिंपरी-चिंचवड, मावळ आणि घाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड :
पुणे जिल्हा, मावळ आणि घाटमाथा परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने २१ आणि २२ जुलैसाठी पुणे घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरड कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज (२० जुलै) पुणे घाट परिसरासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मात्र, २१ आणि २२ जुलै रोजी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २३ जुलै रोजी पावसाचा जोर कमी होऊन ग्रीन अलर्ट, तर २४ जुलै रोजी पुन्हा यलो अलर्ट राहणार आहे.

या कालावधीत मावळ, लोणावळा, ताम्हिणी घाट, भोर, वेल्हा तसेच पिंपरी-चिंचवडलगतच्या घाटमाथा परिसरात विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी-नाले, धबधबे आणि जलाशय परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यात २१ जुलै रोजी ठाणे, रायगड आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे. तर पालघर, रत्नागिरी, नाशिक घाट आणि सातारा घाट परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २२ जुलै रोजी रायगड आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून, विदर्भातील काही जिल्हे तसेच पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाट परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः घाट रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी. पर्यटकांनी धबधबे, नदीपात्रे आणि दरडप्रवण भागात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *