Pimpri-Chinchwad-विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार दिवसांत ६९ स्कूल वाहनांवर कारवाई वाहतूक पोलीस-आरटीओची संयुक्त धडक मोहीम; ३.७६ लाखांचा दंड, नियमभंग करणाऱ्यांना इशारा
पिंपरी-चिंचवड :
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त धडक मोहीम राबवली. चार दिवस चाललेल्या विशेष तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ३ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वाहतूक शाखेने आरटीओशी समन्वय साधून विशेष मोहीम आखली. त्यानुसार आरटीओच्या ‘वायुवेग पथकां’च्या मदतीने पिंपरी, वाकड, सांगवी, महाळुंगे, चिखली, तळवडे आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत २९ जून, ३० जून, २ जुलै आणि २० जुलै रोजी तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण १८१ शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६९ वाहनांवर विविध नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून एकूण ₹३,७६,९०० इतका दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यजित आदमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाहतूक विभागातील अधिकारी, अंमलदार आणि आरटीओच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम यशस्वी केली.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊ नयेत, तसेच आवश्यक परवानग्या व सुरक्षाविषयक निकष पूर्ण करावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने दिला आहे.