बँक खात्याचा गैरवापर करत सायबर फसवणूक; एकावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – सायबर गुन्हेगारांशी संगणमत करून एका महिलेने स्वतःचे बँक खाते बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी वापरू दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्वेता प्रसाद आगळे (४०४, आगळेवस्ती, चांदखेड, मावळ, पुणे) या महिला खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणून स्वतःच्या आयडीबीआय बँकेच्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी केला. केरळ, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील तक्रारदारांचे एकूण १ लाख ३० हजार रुपये या खात्यात जमा झाले होते. त्यापैकी ४० हजार रुपये एटीएमद्वारे काढून घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.