नवी दिल्ली : देशभरात NEET प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे संस्थापक शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
संसद भवनातील पंतप्रधानांच्या कक्षात झालेल्या या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे हस्तांदोलन करून स्वागत केले. दोन्ही नेते मनमोकळेपणाने संवाद साधताना आणि हसताना दिसल्याची छायाचित्रे समोर आली आहेत.
या भेटीचा अधिकृत अजेंडा जाहीर करण्यात आलेला नसला, तरी तिचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही अशाच प्रकारच्या चर्चांना वेग आला होता.
दरम्यान, या भेटीचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी किंवा सध्याच्या राजकीय घडामोडींशी काही संबंध आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागील नेमके कारण काय, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
