भात लावणीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा आढळला मृतदेह
भात लावणीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात आढळून आला. महिलेचा मृतदेह बुधवारी (२९ जुलै) सकाळी बाहेर काढण्यात आला. सुनीता हेलम (५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
सुनीता या त्यांच्या घरातून मागील आठ दिवसांपूर्वी भात लावणीसाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. मंगळवारी दुपारी एक व्यक्ती मुळशी धरणाच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी आली. त्यांना एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ अहिरेवाडी गावच्या पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, शार्दूल बलकवडे, पप्पू नवले, समीर सुतार, तेजस जाधव, मनोज बलकवडे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पथकाने बुधवारी सकाळी महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. पौड पोलीस तपास करीत आहेत.