फ्लेक्स, वाढदिवस आणि शक्तीप्रदर्शनावर लाखोंची उधळण; पण हुशार विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी हात आखडता
पिंपरी-चिंचवड :
दहावी-बारावीचा निकाल लागला की पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणूकीपूर्वी उत्साहाचे वातावरण असायचे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा रंगायची. मोठमोठे मंच उभारले जायचे. विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव व्हायचा. सायकली, पुस्तके आणि बक्षिसांचे वाटप केले जायचे. मात्र, यंदा शहरात असे एकही चित्र दिसत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर “राजकारण्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा विसर पडला का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल लागून अनेक दिवस उलटले आहेत. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी मुंबई आणि इतर शहरांकडे रवाना होत आहेत. असे असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणावर एकही गुणगौरव सोहळा झालेला नाही.
शहरातील काही शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांचा सन्मान केला. मात्र, स्वतःला शिक्षणप्रेमी म्हणवणारे अनेक राजकीय पक्ष आणि पदाधिकारी या विषयावर पूर्णपणे शांत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पालकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आमच्या मुलांनी वर्षभर रात्रंदिवस मेहनत घेतली. चांगले गुण मिळवले. पण त्यांचे कौतुक फक्त सोशल मीडियावरील पोस्टपुरतेच मर्यादित राहिले. वाढदिवस, फ्लेक्स आणि राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी लाखो रुपये खर्च होतात. मग विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी निधी आणि वेळ का मिळत नाही?” असा संतप्त सवाल चिंचवडमधील एका पालकाने उपस्थित केला.
पूर्वी निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक प्रभागात गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होत होते. विद्यार्थ्यांना सायकली, लॅपटॉप आणि विविध बक्षिसे दिली जात होती. मात्र, निवडणुका संपल्यानंतर नेत्यांची आस्थाही संपल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.
शहरात सध्या फ्लेक्सबाजी, वाढदिवस आणि राजकीय कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा गौरव हा केवळ कार्यक्रम नसून पुढील पिढीला प्रेरणा देणारा संस्कार आहे, याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आजचे गुणवंत विद्यार्थी हेच उद्याचे डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी असणार आहेत. शहराचे नाव देशभरात उज्ज्वल करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा सन्मान फक्त शाळा आणि महाविद्यालयांनीच करायचा का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घ्यावी. गुणवंतांना प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, अशी अपेक्षा आता सुज्ञ पिंपरी-चिंचवडकरांकडून व्यक्त होत आहे.
