पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३ मे) रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास काळेवाडी येथील एम. एम. चौकात घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर घडली.
अजित राजू चौगुले (वय २५, रा. काकडे पार्क, चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (वय १९, रा. साईनाथनगर, थेरगाव), सचिन बाबासाहेब चौधरी (वय २६) आणि वसिम बाबर खान (वय २८, दोघेही रा. जगतापनगर, थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन संपत शिंदे (वय २५, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी रविवारी (दि. २४ मे) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मेव्हणा विशाल भोसले याच्यासोबत आरोपींचा किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून आरोपींनी विशालला गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न कला. यात विशाल गंभीर जखमी झाला. काळेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक
