Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
नवी दिल्ली(delhi) : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या उपोषणादरम्यानचे चार छायाचित्रे शेअर करत त्यांच्या गांधीवादी सत्याग्रहाचे कौतुक केले आहे.
पोस्टमध्ये अभिजित दिपके यांनी म्हटले आहे की, “सोनम वांगचुक यांच्या गांधीवादी सत्याग्रहाने संपूर्ण देशाला जागे केले. देशातील युवकांसाठी त्यांनी केलेला 26 दिवसांचा उपवास हा पवित्र आणि सर्वोच्च त्याग होता. अशक्य वाटणाऱ्या संघर्षाविरुद्ध संपूर्ण देशाला एकत्र आणणारी नैतिक शक्ती म्हणून हा सत्याग्रह इतिहासात नोंदला जाईल.”
पुढे त्यांनी लिहिले की, “तुमच्या योगदानाबद्दल आम्ही कितीही धन्यवाद दिले तरी ते अपुरेच राहतील. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या सत्याग्रहाबद्दल सदैव ऋणी राहू.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अभिजित दिपके यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांकडून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.