देहू/प्रतिनिधी :
अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचा अनमोल संगम लाभलेले जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर सध्या गंभीर संकटातून जात असल्याची भावना वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. या पवित्र डोंगर परिसरात सुरू असलेल्या उत्खनन व विध्वंसाच्या प्रकारांविरोधात जनआंदोलन उभारण्यासाठी आणि पुढील दिशा निश्चित करण्यासाठी दि. ६ जून रोजी निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराजांना भामचंद्र डोंगरावर अध्यात्मिक साक्षात्कार झाला असल्याची श्रद्धा लाखो वारकरी भाविकांमध्ये आहे. त्यामुळे हा परिसर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा म्हणूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र गेल्या काही काळापासून डोंगर परिसरात सुरू असलेल्या उत्खनन आणि नैसर्गिक रचनेच्या होणाऱ्या हानीमुळे वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
भामचंद्र डोंगराचे अस्तित्व आणि पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून, या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ६ जूनची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत डोंगर परिसरातील सद्यस्थिती, उत्खननामुळे होणारे पर्यावरणीय आणि धार्मिक परिणाम, तसेच पुढील कायदेशीर व लोकशाही मार्गाने उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
बैठकीसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यामध्ये ह.भ.प. तुकोयाभक्त मधुसूदन महाराज पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवानजी शेंडगे पाटील, भामचंद्र संरक्षण समितीच्या कोषाध्यक्ष माधवीताई माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. उपस्थित मान्यवरांकडून भामचंद्र डोंगराच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
भामचंद्र डोंगर हा केवळ एक डोंगर नसून वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. संत तुकाराम महाराजांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या भूमीचे संवर्धन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत विविध संत, महंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या बैठकीतून डोंगराच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती आणि पुढील लढ्याची दिशा निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या महत्त्वपूर्ण बैठकीस सर्व संपादक, पत्रकार, सोशल मीडिया प्रतिनिधी, वारकरी बांधव, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भामचंद्र संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमीचे पावित्र्य आणि अस्तित्व कायम राखण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगराच्या संरक्षणासाठी ६ जून रोजी निर्णायक बैठक
