‘डेथ स्पॉट्स’वर प्रशासनाचा बुलडोझर; अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटींवर आता थेट प्रहार!

पुणे-पिंपरी चिंचवडमधील अपघातप्रवण ठिकाणांची होणार संयुक्त पाहणी

२९ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड ः
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या रस्ते अपघातांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. दररोज होणारे अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप जीव पाहता जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अपघातप्रवण ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व संबंधित विभागांना थेट मैदानात उतरवले आहे.
“रस्त्यांवरील मृत्यूची साखळी थांबलीच पाहिजे. केवळ बैठका घेऊन चालणार नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन उपाय शोधावेत,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, पिंपरी-चिंचवड आरटीओ संदेश चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘ब्लॅक स्पॉट्स’ची प्रत्यक्ष तपासणी
पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील सर्व अपघातप्रवण ठिकाणांना भेट देणार आहे. रस्त्यांची रचना, वाहतूक व्यवस्था, फलकांची कमतरता, अतिक्रमणे आणि इतर कारणांचा अभ्यास केला जाणार आहे.
या पाहणीनंतर अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल २९ जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघात रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’
रस्ते सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुधारणा.
वाहतूक नियमांचे कठोर पालन.
वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई.
महामार्गांवर जनजागृती मोहीम.
टोलनाक्यांवर सुरक्षा संदेशांचे फलक.
धोकादायक चौकांमध्ये अतिरिक्त सुरक्षा उपाय.

नवले पूल परिसरावर विशेष लक्ष
वारंवार अपघातांमुळे चर्चेत असलेल्या नवले पूल परिसरासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला जाणार आहे. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘अपघातमुक्त जिल्हा’चे लक्ष्य
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघात कमी करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. ग्रामीण भागातील अपघातप्रवण स्थळांची यादी तयार झाली आहे. लवकरच संयुक्त पाहणी सुरू होणार आहे.

नागरिकांचीही जबाबदारी
रस्ते सुरक्षित करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी वाहनचालकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हेल्मेट, सीटबेल्ट, वेगमर्यादा आणि वाहतूक शिस्त यांचे पालन केल्याशिवाय अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ‘ब्लॅक स्पॉट्स’ हटविण्याची ही मोहीम यशस्वी ठरली, तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आता प्रशासनाच्या या धडक कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *