पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. शस्त्र परवान्यांचा गैरवापर, नियमांचे उल्लंघन तसेच आवश्यक कारणांचा अभाव आढळून आल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १५ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. याशिवाय नव्याने शस्त्र परवाना मिळावा यासाठी आलेले ६८ अर्जही फेटाळण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयाकडून शस्त्र परवान्यांची सविस्तर पडताळणी करण्यात आली. यामध्ये काही परवानाधारकांकडून शस्त्राचा गैरवापर झाल्याची तसेच काही व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर संबंधितांना नोटिसा देऊन चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर पाच जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये मयुर काळुराम भोईर (रा. हिंजवडी), सुभाष भिकाजी सपकाळ (रा. नवी सांगवी), विजय नामदेव लांडे (रा. भोसरी), साहिल राजेंद्र ढमाले (रा. देहुगाव) आणि शांताराम दत्तात्रय चव्हाण (रा. आंबेठाण) यांचा समावेश आहे.
तसेच शस्त्र खरेदीसाठी परवाना मंजूर होऊनही विहित कालावधीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या दोन जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर वृद्धत्व, मृत्यू आणि अन्य प्रशासकीय कारणांमुळे आणखी आठ परवाने रद्द करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, नव्या शस्त्र परवान्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना ६८ अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्यासाठी कोणतेही ठोस कारण किंवा सुरक्षेचा पुरेसा आधार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हे सर्व अर्ज नामंजूर करण्यात आले.
शस्त्र परवाना हा केवळ प्रतिष्ठेचा विषय नसून तो गंभीर जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळे भविष्यातही शस्त्र परवान्यांच्या बाबतीत नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. गैरवापर अथवा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तालयाने दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील शस्त्र परवाना व्यवस्थेवर अधिक नियंत्रण येण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा दणका! आयुक्तालयातील १५ जणांचा शस्त्र परवाना रद्द नव्या शस्त्र परवान्यासाठीचे ६८ अर्ज फेटाळले
