खडकीत १० ते १२ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती; तरुणांसाठी भारतीय सैन्यात दाखल होण्याची सुवर्णसंधी बीईजी केंद्रात भरती मेळावा; विविध पदांसाठी शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि नोंदणी होणार
पुणे :
भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खडकी येथील बाँबे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर (बीईजी) येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्समन – ८ वी व १० वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) पदांसाठी पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे.
भरतीपूर्वी ३१ जुलै रोजी अग्निवीर खेळाडूंची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी मराठा प्रवर्गातील अग्निवीर (जनरल ड्युटी) पदासाठी भरती प्रक्रिया होईल. ११ ऑगस्ट रोजी शीख (मजहबी व रामदासी), मुस्लिम प्रवर्ग, एम अँड आर, अग्निवीर (स्टोअर कीपर/ऑफिस असिस्टंट), अग्निवीर ट्रेड्समन (८ वी व १० वी उत्तीर्ण) तसेच विविध सपोर्ट स्टाफ पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. १२ ऑगस्ट रोजी खुल्या प्रवर्गातील अग्निवीर खेळाडूंची भरती होणार आहे.
भरतीदरम्यान उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि संगणकीय नोंदणी केली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी संबंधित दिवशी सकाळी ५ ते ८ या वेळेत नंदा गेट, बाँबे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सकाळी ८ नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अग्निवीर खेळाडू भरतीमध्ये फुटबॉल, हॉकी, पोहणे, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, कुस्ती, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्स आदी क्रीडा प्रकारांतील पात्र खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे.
भरती प्रक्रियेबाबतची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सेवा अटी आणि इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (नि.) यांनी केले आहे.