Mumbai-वाहन भाडे कंत्राटात आर्थिक विसंगतीचा आरोप; विशेष लेखापरीक्षणाची मागणी

मुंबई(mumbai) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहन भाडे कंत्राटात गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी त्यांनी स्थायी समितीत केली.

हे कंत्राट ५ जून २०२४ ते ४ जून २०२६ या कालावधीसाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र आता ते डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. याच प्रस्तावात सातही गटांसाठी (ग्रुप्स) समान काम असूनही वाढीव रक्कम वेगवेगळी दाखवण्यात आल्याचा आरोप तिवाना यांनी केला आहे.

मूळ निविदेनुसार प्रत्येक ग्रुपसाठी सुमारे ६.४३ कोटी रुपये इतकी समान रक्कम मंजूर होती. मात्र मुदतवाढीच्या प्रस्तावात प्रत्येक ग्रुपसाठी वेगवेगळ्या वाढीव रकमांचा उल्लेख करण्यात आला आहे—ग्रुप १ ते ७ मध्ये सुमारे ६० लाख ते ९९.६५ लाख रुपयांपर्यंत फरक दिसून येतो.

या आर्थिक फरकाबाबत प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे सांगत तिवाना यांनी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी, वाहन वापराच्या लॉगशीटची तपासणी, इंधन वापर व बिलांचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही देयक अदा करू नये, अशीही त्यांची ठाम भूमिका आहे.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या खर्चातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थायी समितीत यावर पुढील चर्चा अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *