मुंबई : विधानभवनातील एका बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार विधानभवनात आले असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दालनात बैठक घेणे हे अनेक राजकीय प्रश्न निर्माण करणारे असल्याचे म्हटले. या भेटीमागे नेमके काय कारण आहे, याबाबत जनतेसमोर स्पष्टता यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, शरद पवार यांच्या या भेटीबाबत विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. मात्र, या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
