​pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान पोलीस आयुक्तालयाचा कडक आदेश

​पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान पोलीस आयुक्तालयाचा कडक आदेश

​पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी; शस्त्रे, मिरवणुका आणि आक्षेपार्ह घोषणांवर निर्बंध

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

हा आदेश २७ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ९ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या कृतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, तलवारी, काठ्या, भाले, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेत, प्रतिमा किंवा चित्रांचे प्रदर्शन आणि दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मोठ्याने घोषणाबाजी करणे, वाद्य वाजविणे, आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर भाषणे करणे, तसेच समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे साहित्य प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय, पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सभा, मोर्चे किंवा मिरवणुका काढता येणार नाहीत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शासन सेवेत असलेल्या आणि कर्तव्यपूर्तीसाठी शस्त्रे बाळगण्याची अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून संबंधितांना शिक्षेस सामोरे जावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *