तरुणांना आंदोलनाचे आवाहन करणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वत: गाढव नाक्यावर आंदोलन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला

आजवर संजय राऊत एकाही आंदोलनात सहभागी झाले नाहीत. शिवसेनेसाठी त्यांनी कधीही तुरुंगवास भोगला नाही. एकदा तुरुंगवास भोगला तोही पत्राचाळीत घोटाळा केल्याबद्दल. आता देशातल्या तरुणाईला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणाऱ्या संजय राऊत यांनी आधी स्वतः भांडुपच्या गाढव नाक्यावर आंदोलन करावे आणि एकट्याचा भव्य मोर्चा काढावा, असा टोला लगावत त्यांची पात्रता गाढव नाक्यावर आंदोलन करण्याचीच आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी फटकारले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नीट पेपरफुटीतील सर्व दोषींना अटक करण्याचे काम सीबीआयने केले. राज्य सरकारनेही कारवाई केली. मुळात नीट परीक्षेत कुठलीही गडबड होऊ नये यासाठी केंद्र सरकार अतिशय सतर्क आहे. कोक्रोच जनता पार्टी असेल किंवा अन्य कुणीही लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकते. संजय राऊतांनीही भांडुपच्या गाढव नाक्यावर जाऊन बसून आंदोलन केले पाहिजे. तुमच्या मागे गाढव नाक्यावरचे गाढवही उभे राहणार नाही, असे श्री. बन यांनी सुनावले.
गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागण्याची संजय राऊत यांची पात्रता आहे का, असा सवाल करीत श्री. बन यांनी पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसलेल्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला नव्हता याची आठवण करून दिली. अमित शाह यांनी दहशतवादी, बांगलादेशी घुसखोरांना सळो की पळो करून सोडल्याने त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे स्वाभाविक आहे. कारण संजय राऊत यांचे सगळे नातेवाईक पाकिस्तान आणि बांगलादेशात असल्याची टीका केली.
नितेश राणे यांनी काल संजय राऊत यांना बर्नोल पाठवल्यानंतर संजय राऊतांना ते चांगलेच झोंबले. आपल्या जखमांना जरा बर्नोल लावून घ्या. कारण महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्ष टिकणार असा दावा करत होता तेव्हा तुम्हाला पहिली जखम झाली. वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पायउतार होतील, असे म्हणालात. परंतु मोदींना बारा वर्षे पूर्ण झाल्याने दुसरी जखम झाली. देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत अशा वल्गना राणा भीमदेवी थाटात अनेकदा केल्या. परंतु तुमच्या नाकावर टिच्चून देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने चौथी जखम झाली. तुमच्या जखमा आणखीनच वाढणार आहेत. कारण जनता रोज तुम्हाला जोडे मारून जखमा देते. सकाळची वायफळ बडबड बंद व्हावी म्हणून नितेश राणे यांनी बर्नोल पाठवले आहे. तुमच्यासारखे नितेश राणे हे मागच्या दाराने राज्यसभेवर निवडून जात नाहीत तर जनतेतून निवडून येऊन ते मंत्री झालेत. तुमच्यासारखी लाचारी पत्करून, भीक मागून ते खासदार झालेले नाहीत, अशा शब्दात श्री. बन यांनी खरडपट्टी काढली.
रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करणार असतील तर त्यांना मनापासून शुभेच्छा देत श्री. बन पुढे म्हणाले की हे फक्त हे आंदोलन करताना आपले आजोबा कृषीमंत्री होते याचे भान रोहित पवारांनी ठेवले पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना लुटणारे, गोळीबार करणारे हे तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते होते हे रोहित पवार विसरलेत का? दहा वर्षे शरद पवार कृषीमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या होत्या तेव्हा तुम्हाला अन्नत्याग आंदोलन सुचले नाही. आता आंदोलनाच्या नावाने फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी रोहित पवारांची नौटंकी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *