दुबई ते बँकॉक… अखेर सायबर रॅकेटचा मास्टरमाइंड जेरबंद! पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारवाई; कोट्यवधींच्या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधाराला भारतात आणले

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई करत दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर गजाआड केले आहे. इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटीस’ आणि ‘लुकआऊट सर्कुलर’च्या मदतीने थायलंडमधील बँकॉक विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भारतात आणून अधिकृत अटक करण्यात आली.
सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक मोठ्या सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या तपासातून या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला. जून २०२४ मध्ये या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान मुख्य सूत्रधार गणेश काळे दुबईतून संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, काळे भारतातील व्यक्तींकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड मिळवत होता. त्याबदल्यात पैसे दिले जात होते. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी केला जात होता. त्याने दुबईत स्वतंत्र कार्यालयही उभारले होते.
तांत्रिक तपासात आरोपीचे चीनसह इतर विदेशी नागरिकांशी संबंध असल्याचे समोर आले. टास्क फ्रॉड, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक आणि डिजिटल अरेस्टसारख्या गुन्ह्यांमधून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
हिंजवडीतील १८ लाखांच्या आणि सायबर पोलीस ठाण्यातील २ कोटी ६६ लाखांच्या फसवणूक प्रकरणातही त्याचा सहभाग आढळून आला. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये तो दुबईहून बँकॉकला पळून गेला होता. मात्र, अखेर थायलंडमध्ये त्याला पकडण्यात यश आले.
११ जून रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलिसांच्या पथकाने त्याचा ताबा घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *