महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ओळखीचा गैरफायदा घेत सोन्याची चोरी
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – परिचित महिलेने बनावट चावीचा वापर करून घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार महाळुंगे एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघड करत १३ लाख ८७ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
सारिका संतोष भुजबळ (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी घराच्या कपाटातील दागिने चोरीला गेले होते. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
दरवाजाचे कुलूप तुटलेले नव्हते. त्यामुळे परिचित व्यक्तीकडूनच बनावट चावीचा वापर झाल्याची शक्यता लक्षात घेऊन तपासाला सुरूवात झाली. पोलिसांनी सीटीव्ही फुटेज तपासताना एका संशयित महिलेचा वावर आढळला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सारिका भुजबळ हिच्यावर संशय बळावला. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात आरोपी ही फिर्यादीच्या ओळखीची असल्याचे निष्पन्न झाले. घरातील दागिन्यांची माहिती तिला होती. तिने बनावट चावी तयार करून घर उघडले आणि चोरी केली. या प्रकरणात पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
महाळुंगे ः घरफोडीचा गुन्हा अवघ्या चाेविस तासांत उघडकीस आणून पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला.
