देहू येथील इंद्रायणी साहित्यपीठाचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच इंद्रायणी नदीच्या तिरावर पार पडला, कविवर्य नारायण सुमंत यांना इंद्रायणी साहित्यसेवा २०२५ आणि कवी अविनाश काठवटे यांना इंद्रायणी साहित्यसेवा पुरस्कार २०२६ देहू देवस्थानचे विश्वस्त, तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. उमेश महाराज मोरे आणि देहूच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना कविवर्य नारायण सुमंत यांनी “भेदाभेद भ्रम अमंगळ” या उक्तीला अनुसरून, आद्यकवी तुकोबांचा कवित्वाचा वारसा इंद्रायणी साहित्यपीठ पुन्हा जगासमोर आणत आहे ही समाधानाची बाब आहे असे मत व्यक्त केले.
कवी अविनाश यांनी कवीच्या खिशाला हात न घालता इंद्रायणी साहित्यपीठाने उभ्या केलेल्या इतक्या मोठ्या साहित्य चळवळीबद्दल आश्चर्य वाटते असे मत व्यक्त केले. या काव्यमंचाने माझ्या संघर्षाच्या कालावधीत मला देखील संधी दिली आणि माझ्या आयुष्यातला पहिला सन्मान दिला त्याबद्दल इंद्रायणी साहित्यपीठाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी इंद्रायणी साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अहेफाज मुलाणी यांनी इंद्रायणीच्या काठाला “इंद्रायणी काव्यमंच” असे नाव देण्याची मागणी नगराध्यक्ष सौ. दिवटे यांच्याकडे केली. ज्येष्ठ कामगार साहित्यिक श्री दादाभाऊ गावडे यांनी पुणे येथे होणाऱ्या १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक विभागीय साहित्य संमेलन देहूत घ्यावे अशी मागणी केली ज्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. उमेश महाराज मोरे यांनी दुजोरा दिला. भविष्यात संत साहित्य संमेलनाची जोड देऊन अशा प्रकारचे साहित्य संमेलन देहूत आयोजित होत असल्यास त्यास देहू देवस्थान सर्वतोपरी सहाय्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
याच कार्यक्रमात कवी श्रीधर अंभुरे, कवी गजानन उफाडे, कवयित्री अश्विनी लिके यांना इंद्रायणी काव्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सन २०२४ आणि २०२५ या वर्षांमध्ये पार पडलेल्या इंद्रायणी आहे साक्षीला,देहू आणि इंद्रायणी काव्य संध्या,पुणे या मासिक कविसंमेलनातील सर्वोत्कृष्ट कवितांना इंद्रायणीचे रूप असलेले स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे, ह. भ. प. उमेश महाराज मोरे, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, प्रा. विकास कंद, नगरसेवक सचिन साळुंखे, कामगार नेते विठ्ठल काळोखे, रमाकांत पडवळ, वृषाली आढाव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनर्वसु इंगळे यांनी केले तर आभार सविता दिवेकर यांनी मानले.
