पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर सातत्याने कारवाई सुरु आहे. दापोडी येथील विषारी दारूकांड झाल्यानंतर पोलिसांनी या मोहिमेला गती देत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. सलग चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. सोमवारी (१ जून) शहरातील विविध भागात कारवाया करत पोलिसांनी दोन लाख ३९ हजार ६७० रुपयांची दारू जप्त केली.
चाकण उत्तर आणि बावधन येथे प्रत्येकी दोन, संत तुकाराम नगर, दापोडी, सांगवी, भोसरी, पिंपरी, दिघी, चाकण दक्षिण येथे प्रत्येकी एक कारवाई झाली. यामध्ये दोन महिलांसह एकूण १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये दोन लाख ३९ हजार ६७० रुपये किमतीची देशी दारू आणि १६ रमच्या बाटल्या जप्त केल्या. चाकण उत्तर परिसरात एका भट्टीवर कारवाई झाली. त्यात पोलिसांनी ३५० लिटर रसायन नष्ट केले.
संत तुकाराम नगर, भोसरी परिसरात दारूची वाहतूक केली होती. ही वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी मधील भाटनगर येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने घरातच दारू भट्टी लावली असल्याचे उघडकीस आले. त्याच्या ताब्यातून साडेआठ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. आरोपीने गॅस शेगडीवर मोठ्या कढईमध्ये दारूभट्टी लावली होती. पोलिसांनी ही दारूभट्टी उध्वस्त केली आहे.
