पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील शवागृहातील एका कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येमुळे शवागृहातील कर्मचारी तसेच मृतांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे.
वायसीएम रुग्णालयाच्या शवागृहात एकूण ६३ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. मृतदेह सुरक्षित स्थितीत ठेवण्यासाठी येथे तीन कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी एक नवीन जुने असून दोन नवीन कोल्ड स्टोरेज आहेत. त्यापैकी एका कोल्ड स्टोरेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे तापमान नियंत्रित राहत नसल्याचे समोर आले आहे. नियमानुसार कोल्ड स्टोरेजचे तापमान ३ ते ४ अंश सेल्सियसदरम्यान असणे आवश्यक असताना संबंधित यंत्रणेचे तापमान ९ अंश सेल्सियसच्या पुढे जात असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित वाढत्या तापमानाचा परिणाम या कोल्ड स्टोरेजवर झाला असण्याची शक्यता आहे.
तापमान नियंत्रणात नसल्याने शवागृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरत असून, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच मृतांच्या नातेवाईकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शवविच्छेदनासाठी किंवा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील प्रमुख शासकीय आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या वायसीएम रुग्णालयातील शवागृहात अशा प्रकारची समस्या निर्माण झाल्याने प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मृतदेह साठवणुकीसारख्या संवेदनशील सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुर्गंधी घालविण्यासाठी अगरबत्तीचा वापर
शवागृहाच्या आत प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. या दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठी येथील कर्मचा-यांकडून अगरबत्ती लावण्यात येत आहे. यामुळे दुर्गंधी काही प्रमाणात कमी होत आहे.
—
कोल्ड स्टोरेज बंद असल्याबाबत आमच्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड झाला असल्यास तो तातडीने दुरुस्त करण्यात येईल. संबंधित कोल्ड स्टोरेजची वॉरंटी ऑगस्ट २०२६ पर्यंत असल्याने आवश्यक कार्यवाही केली जाईल.
– डॉ. अभयचंद्र दादेवार, महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी
वायसीएम शवागृहातील कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड; दुर्गंधीमुळे कर्मचारी व नातेवाईक त्रस्त ६३ मृतदेह क्षमतेच्या शवागृहातील एका यंत्रणेचे तापमान ९ अंशांच्या पुढे; प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
