Chandrapur-ताडोबा ‘हाऊसफुल्ल’! विदर्भातील अतिरिक्त वाघांचे राजस्थान, ओडिशात स्थलांतर; केंद्र सरकारची मंजुरी
चंद्रपूर : प्रतिनिधी
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह विदर्भातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वनविभागासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. वाढत्या वाघसंख्येमुळे प्रादेशिक संघर्ष तसेच मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त वाघांचे इतर राज्यांमध्ये स्थलांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत ताडोबातील वाघांना राजस्थान आणि ओडिशामध्ये नवीन अधिवास उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये वाघ स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून तब्बल पाच वाघ राजस्थानातील जंगलांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. या स्थलांतराची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, ओडिशा सरकारनेही महाराष्ट्राकडे दोन वाघांची मागणी केली आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळालेली नसून, तो सध्या विचाराधीन असल्याचे समजते.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, ताडोबा आणि विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची वाढती संख्या ही संवर्धनाच्या दृष्टीने मोठे यश असले, तरी मर्यादित अधिवासामुळे वाघांमध्ये क्षेत्रासाठी संघर्ष वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिरिक्त वाघांचे वैज्ञानिक पद्धतीने इतर योग्य अधिवासांमध्ये स्थलांतर करणे ही अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक प्रक्रिया आहे.
ताडोबातील वाघ राजस्थान आणि भविष्यात ओडिशातील जंगलांमध्ये दाखल झाल्यानंतर त्या राज्यांतील व्याघ्रसंवर्धनालाही मोठी चालना मिळणार असून, महाराष्ट्राच्या व्याघ्रसंवर्धन मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे.