वरवे गावात दुर्मिळ अल्बिनो डुरक्या घोणसाचा थरारक शोध

भोर तालुक्यात प्रथमच नोंद; पांढरे शरीर आणि लाल डोळ्यांचा दुर्मिळ साप आढळल्याने खळबळ

नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील वरवे गावामध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा अल्बिनो डुरक्या घोणस साप आढळून आल्याने वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा, लालसर डोळ्यांचा आणि जन्मजात रंगद्रव्यांच्या अभावामुळे वेगळे स्वरूप असलेला हा साप भोर तालुक्यात प्रथमच आढळल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे.

वरवे येथील अनिकेत कांबळे यांच्या घरामध्ये हा साप आढळून आला. घरात अचानक पांढऱ्या रंगाचा वेगळ्याच प्रकारचा साप दिसताच कुटुंबीयांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ सर्पमित्र संतोष पाटील आणि विलास धोंगडे यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत काळजीपूर्वक सापाचे रेस्क्यू केले. सुरुवातीला हा साप नेमका कोणत्या प्रजातीचा आहे याबाबत संभ्रम होता; मात्र त्याचा पूर्ण पांढरा रंग आणि लालसर डोळे पाहून हा दुर्मिळ प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे सर्पमित्र विशाल शिंदे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी सापाची पाहणी करताच हा अल्बिनो डुरक्या घोणस असल्याचे सांगितले. सामान्यतः डुरक्या घोणस साप तपकिरी, काळपट किंवा मातीसारख्या रंगामध्ये आढळतो; मात्र या सापाच्या शरीरात मेलॅनिन या रंगद्रव्याचा पूर्ण अभाव असल्यामुळे त्याचे शरीर पूर्णपणे पांढरे झाले होते. डोळ्यांमध्येही रंगद्रव्य नसल्याने आतील रक्तवाहिन्या स्पष्ट दिसत होत्या आणि त्यामुळे त्याचे डोळे लालसर झाले होते.

अल्बिनो साप हे अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे निर्माण होतात. जंगलामध्ये अशा सापांचे अस्तित्व फार कमी काळ टिकते. सामान्य सापांचा गडद रंग त्यांना वातावरणात लपण्यास मदत करतो; मात्र अल्बिनो साप पांढरे असल्याने ते शिकारी पक्षी आणि इतर वन्यप्राण्यांना सहज दिसून येतात. तसेच त्यांच्या शरीरात मेलॅनिन नसल्यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचा त्यांच्यावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे असे साप अत्यंत दुर्मिळ प्रमाणात आढळतात.

रेस्क्यू करण्यात आलेल्या या दुर्मिळ सापाला नंतर सुरक्षित जंगल परिसरात सोडण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते हे देखील उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा स्रोत, सुरक्षित अधिवास आणि भक्ष उपलब्ध होईल अशा नैसर्गिक ठिकाणी सापाला मुक्त करण्यात आले.

सुशील विभुते

“अल्बिनो प्रकारातील साप अत्यंत दुर्मिळ असतात. जंगलात त्यांचे जिवंत राहणे मोठे आव्हान असते. अशा सापांचे संरक्षण करणे ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लोकांनी भीतीपोटी सापांना मारू नये आणि तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा.”

 

सर्पमित्र विशाल शिंदे

“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध प्रकारच्या सापांचे रेस्क्यू करत आहोत; मात्र भोर तालुक्यात प्रथमच इतक्या दुर्मिळ अल्बिनो डुरक्या घोणसाची नोंद झाली आहे. मेलॅनिन रंगद्रव्याच्या अभावामुळे या सापाचे संपूर्ण शरीर पांढरे झाले असून त्याचे लालसर डोळे हे त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य आहे. निसर्गामध्ये असे साप अत्यंत कमी प्रमाणात टिकून राहतात. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून पर्यावरणातील जैवसाखळी संतुलित ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. अशा दुर्मिळ वन्यजीवांचे संवर्धन करणे ही केवळ वनविभागाची नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *