2 में ला जाहीर होणार बारावी ( HSC) चा निकाल

राज्यातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, 2026 सालाचा बारावीचा निकाल शनिवार, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केला जाईल. निकाल जाहीर होण्यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली जाणार आहे.
यंदाची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 11 मार्चपर्यंत चालली होती. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे निकालाची प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांना वेळेत निकाल मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी विविध अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल. यामध्ये hscresult.mkcl.org, hscresult.mahahsscboard.in आणि mahahsscboard.in या वेबसाइट्सचा समावेश आहे. याशिवाय, डिजीलॉकर या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एकाच वेळी वेबसाइटला भेट देतात, त्यामुळे काही वेळा संकेतस्थळे मंदावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत डिजीलॉकर हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरू शकतो.
मागील वर्षी बारावीचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला होता. त्यामध्ये मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेत 94.54 टक्के उत्तीर्णता मिळवली होती, तर मुलांची टक्केवारी 89.51 इतकी होती.
जे विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मंडळाकडून लवकरच पुरवणी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षांचा निकाल पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी वेळेत प्रवेश घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *