चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय: ९ वर्षे बंद, २० कोटी खर्चूनही प्रतीक्षा कायम

सुशोभीकरणाच्या नावाखाली विलंब; ठेकेदारांना मुदतवाढीचा ‘बक्षीस’?
पिंपरी-चिंचवड : बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय हे शहरातील प्रमुख आकर्षण असलेले प्राणी संग्रहालय गेल्या तब्बल नऊ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सुशोभीकरणासाठी आतापर्यंत सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी काम पूर्ण होण्याऐवजी विलंबच वाढत असल्याचे चित्र आहे.

🔸 १४ कोटींच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही रखडले
सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील सुमारे १४ कोटी रुपयांच्या कामासाठी केवळ सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून वेळेत परवानगी मिळाली नाही, हे कारण देत संबंधित ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी, कामाची गती ‘कासवगती’च राहिली आहे.

🔸 प्राणी हलवले, पण प्रकल्प अजूनही अधांतरी
सुशोभीकरणाच्या कामासाठी संग्रहालयातील प्राणी इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. मात्र, प्रकल्प पूर्णत्वास न गेल्यामुळे नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔸 नागरिकांचा संताप; कारवाईची मागणी
कामात सातत्याने होणारा विलंब आणि ठेकेदारांना वारंवार दिली जाणारी मुदतवाढ यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून खर्च वसूल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

🔸 वनविकास महामंडळाकडे कारभार हस्तांतरण
प्राणीसंग्रहालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा कारभार वनविकास महामंडळाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भविष्यात पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

🔸 उन्हाळी सुट्टीतही पर्यटकांची निराशा
उन्हाळी सुट्टीच्या काळात विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या अपेक्षेने येथे भेट देतात. मात्र, संग्रहालय बंद असल्यामुळे त्यांना ऐनवेळी माघारी फिरावे लागत आहे.

🔸 प्रशासनाकडून स्पष्ट भूमिकेची प्रतीक्षा
महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि प्राणी संग्रहालय नेमके कधी सुरू होणार याची ठोस माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही प्रकल्प रखडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी ठोस निर्णय घेऊन हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *