आंब्याचा हंगाम आणखी महिनाभर वाढला; ८० ते १०० रुपये किलो घाऊक दर, ‘गोल्डन चौसा’ही लवकरच बाजारात
पिंपरी-चिंचवड :
हापूस आणि केसर आंब्याचा हंगाम संपत असतानाच आंबाप्रेमींसाठी दिलासादायक बातमी आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या फळबाजारात आता बिहार आणि उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध ‘चौसा’ आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. गोड चव, भरपूर रस आणि मोठा आकार यामुळे चौसा आंब्याला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील आंब्याचा हंगाम आणखी महिनाभर लांबला आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डीतील घाऊक फळबाजारात दररोज चौसा आंब्याची आवक होत आहे. जून ते ऑगस्ट हा या आंब्याचा मुख्य हंगाम आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाना आणि पंजाबमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. हापूसनंतर बाजारातील मागणी टिकवून ठेवण्यात चौसा आंब्याची महत्त्वाची भूमिका असते.
सध्या हा आंबा ५ ते ६ किलोच्या आकर्षक बॉक्समध्ये उपलब्ध आहे. एका आंब्याचे वजन साधारण २५० ते ५०० ग्रॅमपर्यंत असते. चवीला गोड आणि रसाळ असल्याने कुटुंबांसह हॉटेल व्यवसायिकांकडूनही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘गोल्डन चौसा’ हा प्रीमियम प्रकारही लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
सध्याचे बाजारभाव (प्रतिकिलो)
नॉर्मल चौसा: घाऊक ₹८० ते ₹१०० | किरकोळ ₹१२० ते ₹१५०
गोल्डन चौसा: घाऊक ₹१०० ते ₹१२० | किरकोळ ₹१५० ते ₹२००
“हापूस आणि केसरचा हंगाम संपल्यानंतर ग्राहकांचा कल चौसा आंब्याकडे वाढतो. बिहार आणि उत्तर प्रदेशातून दर्जेदार माल येत आहे. बाजारात येणारा चौसा हातोहात विकला जात आहे,” असे फळ व्यापारी सांगत आहेत.
चव, सुगंध आणि परवडणारे दर यामुळे चौसा आंब्याने पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत दमदार एन्ट्री केली असून, आंबाप्रेमींसाठी हा गोडवा आणखी काही आठवडे कायम राहणार आहे.
