पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad crime) – पुणे ते रावेत असा प्रवास करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कारला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावत मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील मोरवाडी ब्रिजखाली घडली आहे.
अर्जुन युवराज पाटील (वय ३६, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड, मूळ रा. सांगली), कृष्णाथ मोहन कोरडे (वय ४३, रा. नऱ्हे, कात्रज, पुणे) आणि सागर बिभीषण घोगरे (वय ३७, रा. आर्वी, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक प्रदीप विजय नाईक (वय ३६, रा. रावेत गावठाण, गणपती मंदिरासमोर, रावेत, पुणे) यांनी शनिवारी (दि. ३० मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक कारने जात असताना, मोरवाडी ब्रिजखाली ग्रेड सेपरेटर रोडवर आरोपींनी त्यांच्या वाहनाने फिर्यादीच्या कारला ओव्हरटेक केले. यादरम्यान रस्त्यावर साचलेले पाणी फिर्यादी व त्यांच्या गाडीतील नातेवाइकांच्या अंगावर उडाले. आरोपींनी फिर्यादीच्या कारसमोर स्वतःची कार आडवी लावून रस्ता अडवला.
त्यानंतर कारमधून उतरून फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.
