पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
पिंपरी-चिंचवड : पिंपरीगावातील वैभवनगर परिसरातून मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून गाय चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही मिनिटांत सुमारे २० हजार रुपये किमतीची गाय घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी अभिजीत ज्ञानेश्वर शिंदे (वय ३७, रा. मंजुळ दामोदर निवास, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर, पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २८ जुलै रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास वैभवनगर येथील रेणुका कडबाकुट्टी केंद्र व जगदंबा स्विटहोमच्या शेजारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघा अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून काळ्या-पांढऱ्या रंगाची गोवंश जातीची गाय चोरून नेली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयितांची हालचाल कैद झाली असून, त्याआधारे तपास सुरू आहे.
फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयितांपैकी एकाने काळी हाफ पॅन्ट, काळे सँडो बनियन आणि काळी टोपी घातली होती. दुसऱ्याने काळी थ्री-फोर्थ पॅन्ट आणि राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. तर तिसऱ्या व्यक्तीने काळी पॅन्ट आणि राखाडी रंगाचा शर्ट घातल्याचे दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्यात आले. आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड करत आहेत.